माझी वाटचाल... :- ग. प्र. प्रधान

समाजवादी नेते ग. प्र. प्रधान यांनी आपल्या जीवनप्रवासाचे चित्रण 'माझी वाटचाल' या आत्मकथनामध्ये केले आहे. आपल्या सहजीवनाबद्दल आणि जीवनाकडे पाहण्याच्या

दृष्टिकोनाबद्दल त्यांनी मांडलेली मते याबद्दलचा पुस्तकातील अंश..

आयुष्यभर मी केलेल्या वाटचालीत अनेक गोष्टी, बहुतेक सर्वजणांच्या आयुष्यात घडतात, तशाच थोड्याफार फरकाने घडल्या. त्यांचे निवेदन करण्यात मला स्वारस्य वाटत नाही. एका बाबतीत मात्र मी भाग्यवान ठरलो. स्वातंत्र्य संग्रामाच्या अखेरच्या पर्वात झालेल्या लढ्यामध्ये मला भाग घेता आला आणि त्यामुळेच मी पुढील अनेक वषेर् राजकीय आणि सामाजिक चळवळींमध्ये काम केले. राजकारण, समाजकारण यांप्रमाणेच मी साहित्यावर प्रेम केले, साहित्याचे अनेक वषेर् अध्यापन केले आणि बरेचसे लेखनही केले.

विविध क्षेत्रांमध्ये काम करताना मानवी मनाचे मला जे दर्शन घडले त्याचे सम्यक वर्णन करण्याचे सार्मथ्य माझ्यात नाही. मला सामान्यांचे असामान्यत्व दिसले तेव्हा मी स्तिमित झालो. अनेक बाबतींत मोठ्या असणाऱ्या माणसांच्या मनातील थिटेपणा काही प्रसंगात पाहून मी व्यथित झालो. कलंदर वृत्तीच्या काही जणांच्या सहवासात मला माझ्या सावधपणे जगण्याच्या वृत्तीची लाज वाटली. बुद्धीची विलक्षण झेप असणाऱ्या काही माणसांची आत्मकेंदित आणि आत्मसंतुष्ट वृत्ती पाहून माझे मन उद्विग्न झाले. संगीत, चित्रकला, नृत्य आदी ललितकलांचा रसिकतेने आस्वाद घेताना बेहोष होणारे माझे मित्र पाहून, माझी संवेदनशीलता किती उणी आहे हे मला जाणवले आणि मन उदास झाले. मोहाच्या काही प्रसंगी झालेली माझ्या मनाची तडफड आणि काही प्रसंगांतील दुर्बलता आठवली की आजही माझे मन खिन्न होते. अनेक तऱ्हेचे अनुभव आले आणि तरीही जीवन संपूर्णपणे कळले, असे मला वाटत नाही.

समाजजीवनातील संघर्षाचे स्वरूप, जनमानसातील वादळे मला बरीचशी समजतात. परंतु मानवी मनातील भावनांचे नर्तन आणि वासनांचे तांडव मला काहीसे अनाकलनीय वाटते. काही वेळा, आपण अंधारात तर चाचपडत नाही ना, असे वाटते. त्याचबरोबर लहान मुलांचे निरागस हास्य, फुलांचा मंद सुगंध यांच्यामुळे अनेकदा कोवळ्या सूर्यकिरणांचा स्पर्श माझ्या मनाला झाला; त्या क्षणी तरी माझ्या मनातील अहंकार, अभिनिवेश यांचा लोप झाला. अशा सुष्ट-दुष्ट अनुभवांनी व्यापलेल्या जीवनावर प्रतिभावान साहित्यिक प्रकाश टाकू शकतात. मला ते जमेल असे वाटत नसल्यामुळे, जे मला उमजले, जे गवसले त्याचे प्रांजळ निवेदन करावे, असे मनात आले म्हणून हे आत्मकथन.

१९५०साली माझे लग्न झाले. त्रेपन्न वर्षांहून अधिक काळ आमचा संसार सुखासमाधानाने झाला. याचे श्रेय माझ्या पत्नीलाच आहे.

आमचा प्रेमविवाह नव्हता, मित्र विवाह नव्हता. या दोन्ही बाबतींत प्रतिपक्षाचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे चाकोरीच्या मार्गानेच मी लग्न केले. लग्नापूवीर् आमची ओळख नव्हती. माझ्या आधी माझ्या आईनेच मुलगी पाहिली आणि मला तिच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे खडसावले, 'मुलगी चांगली आहे, नाही म्हणू नकोस.' उगीच चार मुली पहायच्या नाहीत.' मी आईला म्हणालो, 'माझी मतं, माझ्या आयुष्याबद्दलच्या कल्पना तिला माहीत आहेत का?' आई पुन्हा म्हणाली, 'ते काय सांगायचं असेल ते सांग तिला. पण लग्न ठरवूनच घरी ये.'

आईचे माझ्या भावी पत्नीशी जे बोलणे झाले होते, ते तिने मला नंतर सांगितले. आई तिला म्हणाली, 'माझा मुलगा एम. ए. आहे. तू इंटरपर्यंत शिकलीस, मला ग्रॅज्युएट सून पाहिजे. पुढे शिकशील ना? माझी भावी पत्नी या प्रश्नाने चकित झाली आणि अर्थातच 'हो' म्हणाली. आईने नंतर तिला सांगितले, 'तो तुला राजकारणाबद्दल सांगून उगाच घाबरून टाकील. तो चळवळीत तुरुंगात होता, पण त्याच्या बोलण्याकडे फारसे लक्ष देऊ नकोस. संसाराची बेडी पायात पडली की चारचौघांसारखाच वागेल.' माझ्या आईच्या या सल्ल्यामुळे माझ्या भावी पत्नीशी राजकारणाबद्दल मी जे बोललो त्याकडे तिने दुर्लक्ष केले असावे. आम्ही दोघेही एकमेकांना पसंत पडल्यामुळे पहिल्या भेटीतच आमचे लग्न ठरले. ठरल्याप्रमाणे माझी पत्नी मालविका हिने ज्यु. बी. एस्सीच्या वर्गात नाव घातले आणि दोन वर्षांत ती बी. एस्सी झाली. मी फर्गसन कॉलेजमध्ये शिकवत होतो. माझी बहीणही नोकरी करीत होती. आईवडील वृद्ध होते. त्यामुळे मालूवरच संसाराचा भार पडला आणि तिने तो आनंदाने स्वीकारला.

१९४४ साली तुरुंगातून सुटल्यावर सर्व वेळ राजकीय काम करण्याची उमीर् माझ्या मनात होती. परंतु घरच्या जबाबदाऱ्यांमुळे मला नोकरी करणे आवश्यक होते, म्हणून मी एम. ए होऊन १९४५साली अध्यापन व्यवसायात शिरलो. त्या वेळच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार 'राजकीय पक्षाचा पदाधिकारी होणार नाही, सत्याग्रह करणार नाही', या अटी मी स्वीकारल्या होत्या. त्यामुळे १९४५ ते १९६५ या काळात क्रियाशील राजकारणापासून मी दूर होतो. १९६५साली मला असे वाटले की आता मालू जर संसार चालवण्यास तयार असली तर मला नोकरी सोडून समाजवादी पक्षात काम करता येईल. मी मालूला माझे मनोगत सांगितले तेव्हा ती म्हणाली, ' मला माझ्या मनासारखे शिकता आलं. डॉक्टर होता आलं-हे सगळं तुम्ही केलंत, आता तुम्हाला जे करायची इच्छा असेल ते करा. मी संसार सांभाळेन.' मला तिची ही प्रतिक्रिया ऐकून खूप आनंद झाला. समाजवादी पक्षाचे काम पूर्णवेळ करण्यासाठी मी तडकाफडकी कॉलेजकडे राजीनामा पाठवून दिला.

नोकरी सोडताना निवडणुकीस उभे राहण्याचा विचारही माझ्या मनात शिवला नव्हता. परंतु १९६६साली पदवीधर मतदारसंघातून मला उभे करण्याचा निर्णय समाजवादी पक्षाने घेतला. निवडणुकीचा खर्च मलाच करावा लागेल, असेही सांगण्यात आले. मजजवळ तर तुटपुंज्या प्रॉव्हिडंट फंडाशिवाय पैसे नव्हते. कर्ज काढून मी निवडणूक लढविली आणि कर्ज फेडण्यासाठी बायकोचे दोन दागिने मोडले. मी निवडून आलो याचा तिला इतका आनंद झाला की तिने आनंदाने तिचे दोन दागिने मला काढून दिले. मला सख्खा भाऊ नसला तरी माझा एक चुलतभाऊ माझ्यावर फार माया करीत असे. त्याला हे कळल्यावर तो माझ्यावर रागावला आणि माझ्या बायकोला म्हणाला, 'राजकारण हे दारूपेक्षा वाईट व्यसन आहे. या वेळी दोन दागिने मोडायला दिलेस. उरलेले थोडेसे दागिने सांभाळ आणि नवऱ्याला राहते घर गहाण टाकू देऊ नकोस.'' मालूने तिच्या थोरल्या दिराची आज्ञा अखेरपर्यंत पाळली.

१९६६ ते १९८४ अशी अठरा वषेर् मी आमदार होतो. सुरुवातीस ६ वषेर् आमदाराला २५० रुपये वेतन मिळत असे. त्या वेळी आमच्याकडची ये-जा खूप वाढली. मी अनेक दिवस दौऱ्यावर असे. मालूने डॉक्टरी व्यवसाय सुरू करण्यापूवीर् प्रथम नानल रुग्णालयात नोकरी धरली. तिथे वैद्य नानल, वैद्य शि. गो. जोशी आणि विशेषत: वैद्य ताई राजवाडे यांच्या हाताखाली मालूला काम करायला मिळाले. टिळक आयुवेर्दिक महाविद्यालयात शिकत असताना या सर्वांनी तिथे शिकवले होते. आता प्रत्यक्ष काम करताना त्यांनी तिला जे शिक्षण दिले आणि तिथे कामाचा जो अनुभव मिळाला त्यामुळे तिला आत्मविश्वास वाटू लागला. माझ्या मानाने ती अधिक व्यवहारी होती. मात्र ती लोभी मुळीच नव्हती. तिच्या अल्पसंतुष्ट वृत्तीमुळेच तिने माझ्या समवेत हसतखेळत संसार केला. मी चिडखोर आहे, पण माझा राग क्षणिक असतो, हे तिला समजल्यावर तिने मी रागावलो असताना कधी भांडण वाढवले नाही. मात्र माझा राग शांत झाल्यावर काही वेळा ती माझी कानउघडणी करी.

१९७५ साली आणीबाणीत मी तुरुंगात गेलो. परंतु ती मुळीच डगमगली नाही. त्यावषीर् आमच्याकडे बारा वर्षांतून एकदा येणारे नवरात्र होते. मी तुरुंगात असताना तिने ते चुलत दीर-जावाच्या मदतीने उत्साहाने साजरे केले असे मला नंतर समजले. मी तुरुंगात असताना आमच्या घराची एका बाजूची भिंत पडली आणि घर उघडेच पडले. तो मोठा कठीण प्रसंग होता. माझे मित्र लालजी कुलकणीर् यांनी माझ्या पत्नीस साहाय्य केले आणि धीर दिला. आमच्या कुटुंबातील माणसाप्रमाणे वागणाऱ्या गवंड्याने भिंत उभी केली. या वेळीही तुरुंगात मला भेटायला आल्यावर माझी पत्नी तुम्ही काळजी करू का असा मलाच धीर देत असे.

तुरुंगातून सुटल्यावर मी पुन्हा निवडून आलो. १९८० साली मी विधानपरिषदेत विरोधी पक्षनेता झालो. त्यावेळी मुंबईस बंगल्यात गृहिणी असणे आवश्यक होते. पाहुण्यांची, कार्यर्कत्यांची वर्दळ सांभाळणे आवश्यक होते. माझ्या पत्नीने माझ्या मित्राच्या मुलीस दवाखाना चालवायला दिला आणि दोन वषेर् ती आनंदात मुंबईस केवळ गृहिणी म्हणून राहिली.

मी विरोधी पक्षनेता असताना चंदपूर भंडार्यातून सावंतवाडी-बेळगावपर्यंतचे कार्यकतेर् हक्काने माझ्याकडे येत. मी आमच्या बंगल्यातील दोन मोठ्या खोल्या येणार्या कार्यर्कत्यांच्यासाठी राखून ठेवल्या होत्या. कार्यर्कत्यांची व्यवस्था करण्याचे काम एका सेवकाकडे मी सोपवले होते. माझी पत्नी आलेल्या या सर्व पाहुण्यांच्या चहा-फराळाची व्यवस्था पाहत असे. अनेकदा मी दोर्यावर असलो तरी तिने कधी कोणाची गैरसोय होऊ दिली नाही. मृणालताई, अहिल्या रांगणेकर आदी मुंबईतील प्रमुख कार्यर्कत्या मंत्रालयात पक्ष कार्यालयात आल्या की विश्रांती व चहासाठी माझ्याकडे येत. मालू त्यांच्याशी बहिणीसारखीच वागत असे. माझ्या हाताखालचे सेक्रेटरी, टायपिस्ट आणि अन्य सेवक यांनाही मालू कुटुंबीयांप्रमाणे वागवीत असे. आमची सर्व नातेवाईक मंडळी सुटीच्या दिवशी घरी येत. त्यावेळी सर्व सुविधा असल्यामुळे सर्वांचे अतिथ्य करताना मालू फार समाधानी असे. १९८२ साली माझी विरोधीपक्ष नेतेपदाची मुदत संपली, त्या दिवशीच बंगला सोडून आम्ही दोघे पुण्यास परतलो.

आयुष्याची ८२ वषेर् सरत आली. व्यायाम न करताही कसला आजार झाला नाही. शरीराचा, मनाच उत्साह कायम राहिला. कारण ज्यात आनंद वाटला तेच आजवर केले. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. कॉलेजमध्ये अध्यापन केले. सेवादलात अहाणि समाजवादी पक्षात काम करतानाही मुख्यत: मास्तरकीच केली. उपेक्षितांवर, दलितांवर, स्त्रियांवर होणारा अन्याय पाहून मन संतप्त झाले. सामाजिक न्यायासाठी चललेल्या चळवळीत भाग घेतला. वेगवेगळ्या वेळी जे करावे अशी

ऊर्मी मनात आली ती ऊर्मी कधी दडपून टाकली नाही. ह्या परिस्थितीत जे करणे मला शक्य होते ते जीव ओतून केले. हे करण्यात मला समाधान वाटले. साफल्य लाभले. मु फार मोठा त्याग केला असे वाटत नाही. कारण जी गोष्ट आपल्याला हवी असते ती सोडण्याला त्याग म्हणतात. लोकमान्य टिळकांना गणित विषयाच्या अभ्यासात विलक्षण आनंद वाटे, ते श्रेष्ठ गणिती झाले असते परंतु देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याला अग्रक्रम देऊन त्यांनी गणिताकडे बव्हंशाने पाठ फिरवली. हा टिळकांचा फार मोठा त्याग होता. मी असे काही केले नाही. मला जे करावेसे वाटले ते केले. यात त्याग तो कसला?

हे खरे की व्यवहारात ज्याला चैन म्हणतात ती मी कधी केली नाही. परंतु हा केवळ अभिरुचीचा प्रश्ान् आहे. काही जणांना पंचतारांकित हॉटेलात धनवान मित्रमैत्रिणींच्या समवेत खाण्यापिण्यात आनंद वाटतो. मला गरीब कार्यर्कत्यांच्या बरोबर भाजी भाकरी खाण्यात आनंद वाटतो. प्रत्येकाची आवड निवड वेगळी. मी ६५ वषेर् खादी वापरण्यातला, साधे राहण्यातला आनंद उपभोगला. मी त्यात त्याग केला असा खोटा अहंकार मला वाटत नाही. मी जे करत होतो त्या चळवळी अनेकदा अयशस्वी झाल्या तेव्हा मला फार वाईट वाटले. समाजवादी चळवळीची वाताहत झाली, अनेक निष्ठावान कार्यर्कत्यांचे जीवन उध्वस्त होऊन ते निराश झाले याचे मला तीव्र दु:ख होते. मी आमदार झालो, विरोधी पक्षनेता झालो. मला खूप चांगुलपणा मिळाला, परंतु माझ्या असंख्य समाजवादी साथींनी आयुष्यभर फक्त कष्ट केले. दारिद्र्य, उपेक्षा सहन केली यामुळे माझ्या मनात काहीशी अपराधीपणाची भावना आहे. हे मात्र खरे की मी कोणावर अन्याय केला नाही. कोणत्याही कार्यर्कत्याला माझ्या उत्कर्षाचे साधन म्हणून वापरले नाही. यांच्यावर मी काही वेळा चिडलो, रागावलो पण त्यांच्याबद्दलचा माझ्या मनातला स्नेह कायमच राहिला. त्यांनीही माझ्यावर सतत लोभ केला.

अखेरची इच्छा... फक्त एक झाड लावा - G. Pradhan

भोवतालच्या मूल्यांच्या पडझडीत समाजवादी चळवळीतील कार्यकर्ते, नेत्यांसाठी आधारवड ठरलेले ज्येष्ठ व सत्शील नेते, हाडाचे शिक्षक, विचारवंत गणेश प्रभाकरपंत प्रधान अर्थात प्रधान मास्तर यांचे शनिवारी सकाळी पाचच्या सुमारास हडपसर येथील साने गुरूजी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांनी मरणोत्तर देहदान आणि नेत्रदान केले आहे. मृत्यूनंतर आपल्या पाथिर्वावर कोणत्याही प्रकारचे अंत्यसंस्कार करू नयेत, अशी प्रधान यांची इच्छा होती. त्यांचे पार्थिव संध्याकाळी पाचच्या सुमारास हडपसर येथील सुमतीभाई शाह आयुर्वेद कॉलेजमध्ये नेण्यात आले. यावेळी राष्ट्रसेवा दलाची प्रार्थना झाली. तसेच संचलन करून प्रधान सरांना सलामी देण्यात आली.

'मृत्यूनंतर कोणतेही स्मारक उभारू नये, माझ्या बद्दल पेम वाटणाऱ्यांनी एक झाड लावावे आणि किमान पाच वषेर् तरी जगेल, अशी व्यवस्था करावी. माझ्याबद्दल आपुलकी वाटणाऱ्या संस्थांनी पाच झाडे लावावीत'...ही वाक्ये आहेत ग. प्र. प्रधान सरांच्या पत्रातली! मृत्यूनंतर 'साधना' साप्ताहिकामध्ये छापण्यासाठी त्यांनी हे पत्र पाच एप्रिल २००६ रोजी लिहून दिले होते.

प्रधान सर ज्या निस्पृहतेने जगले त्याच निमोर्ही मनाने त्यांनी देह ठेवला. मृत्यूनंतर कोणताही गाजावाजा नको म्हणून त्यांनी साधनाचे संपादक डॉ. नरेंद दाभोलकरांना पत्र लिहून ठेवले. त्या पत्रात त्यांनी स्वातंत्र चळवळीत साने गुरुजींसोबत येरवडा तुरुंगात १९४३ मध्ये रहायला मिळाले, हे परमभाग्य असल्याचे म्हटले आहे. 'साधना'ने साने गुरुजींचा वारसा चालवावा. महाराष्ट्रातील सर्व पुरोगामी चळवळींचे मुखपत्र म्हणून साधनास मान्यता लाभावी, ही अपेक्षाही त्यांनी पत्रात नमूद केली आहे.

दाटलेल्या आठवणी आणि बदललेला मुक्काम

प्रधान सर ११ जून २००८ रोजी साने गुरुजींच्या पुण्यतिथीला सदाशिव पेठेतील त्यांचे घर सोडून मित्र रामभाऊ तुपे यांच्या हडपसरमधील घरी राहायला गेले होते. पत्नी मालविका यांचे निधन झाल्यानंतर सदाशिव पेठेतील घरात ते एकटेच राहात होते. या घरात त्यांनी 'माझी वाटचाल' हे आत्मचरित्र लिहून पूर्ण केले. मात्र, सर्व आठवणी दाटून येऊ लागल्याने त्यांना या घरात राहाणे त्रासदायक वाटू लागले. त्यामुळे त्यांनी तुपे यांच्या घरी राहाण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात त्यांनी सदाशिव पेठेतील घर 'साधना' साप्ताहिकासाठी दिले. त्यानंतर ते साने गुरुजी हॉस्पिटलमधील एका खोलीत राहात होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

समाजसेवक अण्णा हजारे, माजी केंदीय मंत्री मोहन धारिया, समाजवादी विचारवंत भाई वैद्य, रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा आढाव, गृहराज्यमंत्री रमेश बागवे, आमदार उल्हास पवार, नरेंद दाभोळकर, कुमार सप्तर्षी आदींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

प्रधान मास्तर नावाचा संस्कार

प्रा. ग. प्र. प्रधान यांचा जन्म झाला, तेव्हा लोकमान्य टिळकांचे निधन होऊन त्यांचा वारसा महात्मा गांधींनी समर्थपणे पेलायला सुरुवात केली होती. स

्वातंत्र्य चळवळीने भारलेल्या त्या काळाचे संस्कार एकविसाव्या शतकातही कृतार्थ आयुष्याची वाट दाखवण्यास कसे समर्थ आहेत, हे स्वत:च्या जगण्यातून प्रधान यांनी दाखवून दिले. शनिवारी पहाटे त्यांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा त्यांचे पाथिर्वही त्यांनी समाजाच्या स्वाधीन केले होते. वरवर पाहता प्रधान चारचौघांसारखे मध्यमवगीर्य आयुष्यच जगले. या अर्थाने की सर्वसाधारण समाज ज्यामुळे चटकन दीपून जातो, अशी टोकाची कोणतीही कृती त्यांनी केली नाही. तो त्यांचा पिंंडही नव्हता. पण स्वत:च्या पिंडाशी इमान राखत त्याची ताकिर्क टोके गाठण्याच्या धैर्यातही ते कधी कमी पडले नाहीत. शिवाय हे सर्व आपण अंतमंर्नाची उमीर् म्हणून करतो आहोत, त्यातून आनंद घेत आहोत, तर त्याचे कौतुक कशाला, या वृत्तीने त्यांनी केले. नेटका प्रपंच करतानाही किती अंगांनी समाजोपयोगी ठरता येते, याचा त्यांचे आयुष्य हा सुस्थित, संवेदनशील आणि विचारी सामान्यजनांसाठी वस्तुपाठ ठरू शकतो. 'चले जाव' चळवळीत तुरुंगवास भोगताना त्यांनी विशीतल्या प्रेरणांना न्याय दिला. १९४४मध्ये ते तुरुंगातून सुटले, तेव्हा देशभक्तीच्या उमीर्ला तुरुंगातील आचार्य जावडेकर, आचार्य भागवत यांच्यासारख्यांच्या अभ्यासवर्गांमुळे व्यापक पाया लाभला होता. सानेगुरुजींच्या सहवासाने सदसद्विवेकबुध्दीचा आयुष्यभराचा राखणदार आयुष्यात आला होता. पण ते सुटून घरी आले तेव्हा वडील सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारली. ती करताना एमए झाले आणि पुढे फर्गसनमध्ये इंग्रजीचे अध्यापक म्हणून विद्याथिर्प्रियही झाले.मात्र राजकीय-सामाजिक कामही चालूच होते. शोषणमुक्त समाजाचे स्वप्न पाहणाऱ्या, पण लोकशाही मार्गाच्या आग्रहामुळे कम्युनिस्ट विचारसरणीशी फारकत घेतलेल्या समाजवादी प्रवाहाशी त्यांची नाळ जुळली होती. पुढे पत्नीने आथिर्क जबाबदारी घेतली आणि प्रधान सक्रिय राजकारणात आले. त्यांनी पुण्याच्या पदवीधर मतदारसंघातून १९६६ साली विधान परिषदेची निवडणूक लढवली व जिंकलीही. आमदारपदाला न्याय देता यावा म्हणून आधी त्यांनी प्राध्यापकपदाचा राजीनामा दिला, हे त्यांचे वैशिष्ट्य. सक्रिय राजकारणही त्यांनी निष्ठेने निभावले. राज्यातील ग्रामीण जनतेचे प्रश्न समजावून घेण्यासाठी प्रत्येक तालुक्याला भेट देणारे, विधान परिषदेत या प्रश्नांचा अभ्यासपूर्ण पाठपुरावा करणारे प्रधान आदर्श लोकप्रतिनिधित्वाचा मानदंड मानले गेले. आणीबाणीच्या काळात त्यांनी पुन्हा तुरुंगवास भोगला. १८ वषेर् आमदारपदी निवडून आल्यानंतर, इतरांना संधी मिळावी म्हणून सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली आणि प्रबोधनाच्या कामात ते गुंतले. सानेगुरुजींच्या 'साधने'च्या संपादकपदाची जबाबदारी १७ वषेर् त्यांनी पेलली. या काळातही अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचाराच्या विरोधातील आंदोलन असो वा माहितीच्या अधिकारासाठीचे, प्रधानांनी रस्त्यावर उतरून त्यात सहभाग घेतला. सन २००१मध्ये मात्र त्यांनी साधनेच्या जबाबदारीतूनही स्वत:ला मुक्त केले आणि केवळ वाचन-लेखनात ते मग्न झाले. त्यांच्यासाठी वाचन हा आयुष्य समृध्द करणारा आनंद होता, तर लेखन हा संस्कारांचा प्रयत्न. त्यांचे विपुल लेखन याची साक्ष आहे. प्रधान यांची वैचारिक भूमिका स्पष्ट असली, तरी अनेक पर्यायी उत्तरांची शक्यता गृहीत धरणारी आणि न पटणाऱ्या उत्तरांचाही आदर करणारी. त्यामुळे राजकारणातही त्यांना शत्रू नव्हते. मला 'उपदव मूल्य' नव्हते एवढाच याचा अर्थ, असे ते मिश्किलपणे म्हणत. 'उदारमतवादी माणसाला मित्र असतात, पण त्याची धारही कमी असते. म. गांधींनी उदारमतवादाला सत्याग्रहाची जोड दिली म्हणून तिला धार आली', हे त्यांचे निरीक्षण. समाजवादी पक्षाचे जनता पक्षात विलीनीकरण ही चूक होती, कारण त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारे निष्ठावान कार्यकतेर् राजकीय चळवळीतून मिळणाऱ्या आत्मविश्वासाला, बळाला मुकले आणि त्यांच्या कामांतून परिवर्तनाचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता राजकीय संघटनेअभावी मावळली, ही कबुली देण्याचा प्रांजळपणा त्यांच्याकडे होता. मंडल आयोगामुळे वंचितांच्या आकांक्षांचा स्फोट होऊन सुखासीन व्यवस्थेला हादरा बसला हे चांगलेच झाले, हे मत प्रस्थापिताचा भाग होऊन मिळणाऱ्या उपभोगांविषयी निरीच्छ व्यक्तीचेच असू शकते. प्रधान यांची साथ आयुष्यभर या साधेपणानेच केली. स्वातंत्र्यसैनिक, आमदार, पुरस्कार म्हणून मिळालेले पैसे त्यांनी समाजोपयोगी कामांना वाटून टाकले. पत्नीच्या निधनानंतर घरही साधना ट्रस्टच्या स्वाधीन करून केवळ पुस्तके आणि कपड्यांनिशी ते सानेगुरुजी रुग्णालयात वास्तव्याला गेले. व्यक्तिगत आयुष्यात कृतार्थता, पण समतावादी ध्येयांची बाहेरच्या जगात वासलात लागताना पाहणे, या द्वंद्वातही ते निराश नव्हते; कारण समाजातील सत्प्रवृत्तींवरचा त्यांचा दुर्दम्य विश्वास. या विश्वासाला जागण्याची प्रेरणाही त्यांच्याच आयुष्याच्या रूपाने प्रधान मास्तर मागे ठेवून गेले आहेत.