युसूफ मेहरअली सेंटरमध्ये साकारतोय प्रकल्प सात भारतीय आणि विदेशी फाइन आटिर्स्टची कमाल
म. टा. वृत्तसेवा
पनवेलमधील तारा येथील युसूफ मेहरअली सेंटरमध्ये भारतीय आणि विदेशी मिळून एकूण सात फाइन आटिर्स्टनी टाकाऊ वस्तूंपासून वेगवेगळी शिल्पे साकारण्याचे काम हाती घेतले आहे.
सिमेंटची जंगले वाढत चालल्याने पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. त्यातच अविघटनशील असलेल्या प्लास्टिकचा निसर्गावर परिणाम होत असून त्याचा वापर वाढला आहे. त्याचबरोबर शहरातील वाढत्या नागरीकरणामुळे वनसंपत्तीबरोबर सर्व नैसगिर्क गोष्टी आता संपू लागल्या असून त्याचे लोण ग्रामीण भागातही पसरू लागले आहे. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील निसर्गावर होऊ नये, यासाठी शिल्पा जोगळेकर काही वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. त्यांनी तैवान, कोरिया, युरोप या देशांतही निसर्ग संवर्धनासाठी काम केले आहे. आता गेल्या काही दिवसांपासून जोगळेकर रेशाई लिटविन्युक (कॅनडा), मिरियमह्यु मानुआर (फ्रान्स), बाँगी पार्क (कोरिया), न्युरुस पॅटिक (कॅमरून), रमण आदोने आणि प्रशांत जोगदंड यांच्यासह युसुफ मेहरअली सेंटरमध्ये काम करत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून या सेंटरला नॅचरल पार्कचा लूक देण्याचा संकल्प या सात जणांनी केला असून त्यांना स्थानिकाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मिरियम व्ह्यु मानुआर या महिलेने बीअरच्या बाटल्या आणि माती यांच्या माध्यमातून इग्लुप्रमाणे एक शिल्प तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. आजूबाजूच्या रिसॉर्ट आणि हॉटेलच्या पाठीमागे टाकून दिलेल्या बाटल्या जमा करून त्यापासून अतिशय सुबक शिल्प साकारले जात असून त्यांना स्थानिक महिलाही मदत करत असल्याचे प्रकल्प अधिकारी रमेश मुरडेकर यांनी सांगितले.