अखेरची इच्छा... फक्त एक झाड लावा - G. Pradhan

भोवतालच्या मूल्यांच्या पडझडीत समाजवादी चळवळीतील कार्यकर्ते, नेत्यांसाठी आधारवड ठरलेले ज्येष्ठ व सत्शील नेते, हाडाचे शिक्षक, विचारवंत गणेश प्रभाकरपंत प्रधान अर्थात प्रधान मास्तर यांचे शनिवारी सकाळी पाचच्या सुमारास हडपसर येथील साने गुरूजी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांनी मरणोत्तर देहदान आणि नेत्रदान केले आहे. मृत्यूनंतर आपल्या पाथिर्वावर कोणत्याही प्रकारचे अंत्यसंस्कार करू नयेत, अशी प्रधान यांची इच्छा होती. त्यांचे पार्थिव संध्याकाळी पाचच्या सुमारास हडपसर येथील सुमतीभाई शाह आयुर्वेद कॉलेजमध्ये नेण्यात आले. यावेळी राष्ट्रसेवा दलाची प्रार्थना झाली. तसेच संचलन करून प्रधान सरांना सलामी देण्यात आली.

'मृत्यूनंतर कोणतेही स्मारक उभारू नये, माझ्या बद्दल पेम वाटणाऱ्यांनी एक झाड लावावे आणि किमान पाच वषेर् तरी जगेल, अशी व्यवस्था करावी. माझ्याबद्दल आपुलकी वाटणाऱ्या संस्थांनी पाच झाडे लावावीत'...ही वाक्ये आहेत ग. प्र. प्रधान सरांच्या पत्रातली! मृत्यूनंतर 'साधना' साप्ताहिकामध्ये छापण्यासाठी त्यांनी हे पत्र पाच एप्रिल २००६ रोजी लिहून दिले होते.

प्रधान सर ज्या निस्पृहतेने जगले त्याच निमोर्ही मनाने त्यांनी देह ठेवला. मृत्यूनंतर कोणताही गाजावाजा नको म्हणून त्यांनी साधनाचे संपादक डॉ. नरेंद दाभोलकरांना पत्र लिहून ठेवले. त्या पत्रात त्यांनी स्वातंत्र चळवळीत साने गुरुजींसोबत येरवडा तुरुंगात १९४३ मध्ये रहायला मिळाले, हे परमभाग्य असल्याचे म्हटले आहे. 'साधना'ने साने गुरुजींचा वारसा चालवावा. महाराष्ट्रातील सर्व पुरोगामी चळवळींचे मुखपत्र म्हणून साधनास मान्यता लाभावी, ही अपेक्षाही त्यांनी पत्रात नमूद केली आहे.

दाटलेल्या आठवणी आणि बदललेला मुक्काम

प्रधान सर ११ जून २००८ रोजी साने गुरुजींच्या पुण्यतिथीला सदाशिव पेठेतील त्यांचे घर सोडून मित्र रामभाऊ तुपे यांच्या हडपसरमधील घरी राहायला गेले होते. पत्नी मालविका यांचे निधन झाल्यानंतर सदाशिव पेठेतील घरात ते एकटेच राहात होते. या घरात त्यांनी 'माझी वाटचाल' हे आत्मचरित्र लिहून पूर्ण केले. मात्र, सर्व आठवणी दाटून येऊ लागल्याने त्यांना या घरात राहाणे त्रासदायक वाटू लागले. त्यामुळे त्यांनी तुपे यांच्या घरी राहाण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात त्यांनी सदाशिव पेठेतील घर 'साधना' साप्ताहिकासाठी दिले. त्यानंतर ते साने गुरुजी हॉस्पिटलमधील एका खोलीत राहात होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

समाजसेवक अण्णा हजारे, माजी केंदीय मंत्री मोहन धारिया, समाजवादी विचारवंत भाई वैद्य, रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा आढाव, गृहराज्यमंत्री रमेश बागवे, आमदार उल्हास पवार, नरेंद दाभोळकर, कुमार सप्तर्षी आदींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

No comments: